राहूचे गोचर भ्रमण मीन राशीतून’
२८ नोव्हेंबर २०२३ रोजी राहू मीन राशीतील रेवती नक्षत्रात गोचरीने प्रवेश करतो आहे.
राहू हा अशुभ ग्रह आहे. राहूला स्वतःची दृष्टी नाही तसेच स्वतःची रास ही नाही. तो लग्न कुंडलीमध्ये ज्या राशीत असतो, त्या राशीस्वामीचे प्रतिनिधित्व करतो.
मीन राशीला शनिची साडेसाती सुरु आहे आणि मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आता राहू सारखा अशुभ ग्रह गोचर भ्रमणाने जेव्हा मीन राशीत प्रवेश करेल त्यावेळी आपल्या लग्न कुंडलीमध्ये ज्या स्थानात मीन रास असेल त्या स्थानातून मिळणाऱ्या फलितामध्ये कदाचित कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचा अभ्यास आपण इथे करणार आहोत.
१) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास प्रथम स्थानात असेल तर –
जातकाने आपल्या आरोग्याची जास्त काळजी घ्यावी. कोणतीही कृती विचारपूर्वक करावी. भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवावे. आपल्याबद्दल कोणाचेही गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
२) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास दुसऱ्या स्थानात असेल तर –
कुटुंबातील व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. कुटुंबातील विवाहोत्सुक व्यक्तींचे विवाह जमवताना जास्त उशीर करू नये. संतती संदर्भातील प्रश्नांसाठी योग्य वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. कमी मेहेनतीत पैसा कमविण्याचे मार्ग उपलब्ध होतील परंतु विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
३) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास तिसऱ्या स्थानात असेल तर –
लेखकांसाठी हा काळ चांगला आहे. नवनवीन कल्पना सुचतील. गुढशास्त्रामध्ये रुची निर्माण करणारा हा काळ आहे. भावंडांमध्ये थोडे नमते घ्यावे लागेल. भावंडांवर कोणत्याही प्रकारे (शिक्षण अथवा लग्न) खर्च होऊ शकतो.
४) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास चवथ्या स्थानात असेल तर –
स्वतःची जागा किंवा घरासंबंधी कोणताही निर्णय (नवीन घर घेणे, स्वतः चे रहाते घर re-development ला जाणे इ. ) विचारपूर्वक घ्या. बिल्डर कडून फसवणूक होऊ शकते. रहात्या घरातील वातावरण आनंदी रहावे यासाठी घरात वाद – तंटे होऊ देऊ नयेत. आपल्या आईची किंवा घरातील आई समान व्यक्तीची काळजी घ्यावी.
५) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास पाचव्या स्थानात असेल तर –
विद्यार्थ्यांनी अभ्यासात जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. मन विचलित होऊ शकते आणि अभ्यासात अडथळे येऊ शकतात.
ज्या व्यक्ती कलाक्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना नेहेमीपेक्षा थोडी जास्त मेहेनत करावी लागेल. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज होऊ शकतात. सावधानता बाळगावी. संतती संदर्भात विशेष काळजी घेण्याचा हा काळ आहे.
६) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास सहाव्या स्थानात असेल तर –
स्वतःच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्या-पिण्याच्या सवयीकडे लक्ष असू द्यावे. नियमित व्यायाम करावा. नोकरीमध्ये वरिष्ठांशी थोडे नमते घेतलेत तर बरे होईल. जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तरी हा विचार पुढे ढकला. या कालावधीत कर्ज घेणे शक्यतो टाळा. घेतल्यास ऐपतीबाहेर नको. कर्ज फेडताना त्रास होऊ शकतो. या कालावधीत कोर्ट – कचेरी किंवा पोलीसांशी संबंध येऊ शकतो.
७) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास सातव्या स्थानात असेल तर –
जे जातक विवाहोत्सुक आहेत त्यांचे विवाह जमण्याची दाट शक्यता आहे. मात्र गुण-मेलन नीट करावे. जोडीदाराची माहिती पडताळून पहाणे आवश्यक आहे आणि कोणत्याही बाबतीत तडजोड (compromise) करण्याची तयारी असू द्यावी.
८) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास आठव्या स्थानात असेल तर –
कोणतेही अनाठायी धाडस नको. वाहने सांभाळून चालवावीत. कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करू नका. मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आपल्या कुलदेवतेची किंवा आवडत्या देवाची उपासना करणे आवश्यक आहे.
९) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास नवव्या स्थानात असेल तर –
आपले गुरु, आदरणीय अथवा गुरुसमान व्यक्ती, यांच्याशी संपर्क वाढवा. त्यासाठी प्रवास होऊ शकतात. कोणत्याही प्रकारचे उच्च शिक्षण घेत असल्यास थोडे अडथळे येऊ शकतात, पण अंतत: विजय आपलाच आहे. नातवंडांचे सुख मिळेल. या कालावधीत कोर्टाचे निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.
१०) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास दहाव्या स्थानात असेल तर –
नोकरी – व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या वरिष्ठ लोकांबरोबर तसेच आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचारीवर्गाबरोबर उर्मट किंवा अधिकाराची भाषा वापरू नये. १० वी – १२ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाची शाखा निवडताना काळजी घ्यावी. निर्णय चुकू शकतात. कुटुंबात वडिलांची किंवा पितासमान व्यक्तीची काळजी घ्यावी.
११) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास अकराव्या स्थानात असेल तर –
आपले पैसे काही ठिकाणी अडकले असल्यास या वर्षात थोडेफार का होईना, परत मिळण्याची शक्यता आहे. मित्र परिवारामध्ये सांभाळून रहा. खर्च होऊ शकतो. पटकन कोणावरही विश्वास ठेवू नका. उसने पैसे देऊ नका.
१२) लग्न कुंडलीमध्ये जर मीन रास बाराव्या स्थानात असेल तर –
सर्व प्रथम खर्चाला आळा घाला. अनाठायी खर्च टाळा. हितशत्रू वाढू शकतात. नोकरी-व्यवसाय निमित्ताने परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर परदेशातील कामाची अथवा नोकरीच्या ठिकाणाची नीट चौकशी करणे आवश्यक आहे. परदेशातून भारतात येण्याचा विचार करत असाल तर परदेशातील मुक्काम वाढू शकतो. कोणत्याही परिस्थितीत कोर्ट किंवा पोलिसांच्या भानगडीत पडू नये. या कालावधीत कोणालाही कर्ज देऊ नये तसेच कर्ज घेऊ ही नये. कर्ज घेणे जरुरी असेल तर पूर्ण विचाराअंती कुवतीप्रमाणे घेणे.
अशा पद्धतीने राहू चे मीन राशीतील गोचरीचे भ्रमण आपल्याला आपल्या लग्न कुंडलीतील प्रत्येक स्थानाप्रमाणे फळ देईल. भविष्यात आपल्याबरोबर काय घडू शकतं हे आधीच समजलं तर आपण योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहू शकतो.
तळटिप – कुंडलीमध्ये १२ हा अंक मीन रास दर्शवितो. लग्न कुंडलीमध्ये मीन रास (१२ हा अंक) कोणत्या स्थानात आहे व त्या प्रमाणे आपल्याला गोचरीच्या राहू चे फळ काय मिळू शकते हे समजण्यासाठी माहितीपर कुंडली देत आहे.
धन्यवाद.
सौ. उज्ज्वला गुंजीकर
9967015279