साडेसाती मध्ये शनि महाराजांचे उपाय करताना भक्त – संकेत ज्योतिष मंडळ

साडेसातीमध्ये करावयाचे १० प्रभावी उपाय | सौ. उज्ज्वला गुंजीकर – संकेत ज्योतिष मंडळ

साडेसातीमुळे जीवनात येणाऱ्या अडचणी, मानसिक तणाव आणि आर्थिक त्रास यावर शास्त्रानुसार उपाय आहेत का? सौ. उज्ज्वला गुंजीकर (संकेत ज्योतिष मंडळ) यांच्याकडून जाणून घ्या साडेसातीमध्ये सहजपणे करता येणारे १० प्रभावी आणि फलदायी उपाय, जे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात.

नमस्कार,

आज आपण शनि महाराजांच्या साडेसाती मध्ये सहजपणे करता येणारे महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत. त्याआधी साडेसातीच्या त्रासाची सुरुवात कशा रीतीने होऊ शकते हे लक्षात घेऊया.

जर व्यक्ती विद्यार्थी दशेत असेल तर शिक्षणात अडथळे येतात. अभ्यासात लक्ष लागत नाही. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर अशा परीक्षेमध्ये सुद्धा अपयश येते.
विवाह जमवताना वारंवार समोरील स्थळांकडून नकार येणे, लग्न जमण्यास उशीर होणे, वैवाहिक जीवनात भांडण-तंटे अशा गोष्टी वारंवार घडताना दिसतात. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास किंवा नोकरी सुटणे अथवा जाणे, बढती न मिळणे, कुटुंबापासून दूरच्या ठिकाणी बदली होणे अशा प्रकारचे त्रास सहन करावे लागतात.
तसेच पैशाची चणचण भासणे किंवा असल्यास आजारपणावर जास्त पैसा खर्च होणे अशा त्रासांना तोंड द्यावे लागते.

आता आपण साडेसातीच्या काळात करावयाचे काही महत्त्वाचे उपाय पाहणार आहोत जे आपल्याला अगदी सहजपणे शक्य होऊ शकतात.
सर्वप्रथम आपण आपल्या मनात अशी व्यक्ती साकारावी जी वृद्ध/जर्जर आणि पायाने अधू आहे.
साडेसाती मध्ये शनिवारी येणाऱ्या अमावस्येला फार महत्त्व आहे ज्याला ‘शनिअमावस्या’ असं म्हटलं जातं. जर ही अमावस्या फार लांब असेल तर कोणत्याही शनिवारी हा उपाय करता येतो.

साडेसाती मध्ये शनि महाराजांचे उपाय करताना भक्त – संकेत ज्योतिष मंडळ

उपाय १ –
शनिवारी, शनि महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे. मूठभर काळे तीळ व मातीच्या पणतीत तिळाचे तेल यांचे दान करावे. जर शनि महाराजांचे मंदिर जवळपास नसेल तर श्री हनुमानाच्या मंदिरात जाऊन ११ रुईची पाने व मातीच्या पणतीत तिळाचे तेल या गोष्टी दान कराव्यात.

उपाय २ –
हवामानात होणाऱ्या बदलानुसार वृद्ध किंवा पायाने अधू असलेल्या वृद्ध व्यक्तीला कोणत्याही शनिवारी काळ्या रंगाच्या वस्तुचे इच्छाशक्ती दान करावे. जसे की, पावसाळ्यात काळी छत्री, हिवाळ्यात काळे ब्लॅंकेट अथवा काळी बंडी, उन्हाळ्यात उन्हासाठी काळी छत्री किंवा बसण्यासाठी काळ्या रंगाचे घोंगडे (चादर), काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये पिण्याचे पाणी, खाण्याच्या पदार्थांनी भरलेला काळ्या रंगाचा प्लास्टिकचा डबा, काळ्या रंगाचे गुलाबजाम, काळी काठी वगैरे..वगैरे… हे दान देताना ज्या व्यक्तीस साडेसाती सुरू आहे, त्या व्यक्तीच्या डोक्यावरून फिरवून मग ती वस्तू दान करावी.

साडेसातीच्या काळात दानास जास्त महत्त्व आहे हे ध्यानात ठेवावे.

उपाय ३ –
एक स्वच्छ स्टीलचा पाणी भरलेला तांब्या घ्यावा. त्यात थोडी खडीसाखर टाकावी. त्याचबरोबर एक तेलाच्या दिव्याची पणती व ३ मीटर काळा धागा या वस्तू सोबत घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन श्री हनुमान व शनि महाराजांचे स्मरण करून तांब्यातील खडीसाखर मिश्रीत पाणी झाडाच्या बुंध्याशी टाकावे व काळ्या धाग्याने उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने झाडास सात फेरे गुंडाळावेत. धागा जास्त उरल्यास तोडू अथवा कापू नये किंवा गाठ मारू नये तिथेच गुंडाळून अडकवून ठेवावा. त्यावेळेस ||ॐ शं शनैश्वराय नमः|| हा मंत्र जपत रहावा आणि तेलाचा दिवा पेटवून साडेसातीची पीडा कमी करण्यासाठी शनि महाराजांची मनोमन प्रार्थना करावी.

उपाय ४ –
साडेसातीच्या काळात सात मुखी रुद्राक्ष देवघरात ठेवून त्याचे पूजन करावे. रुद्राक्षास गंध, हळद-कुंकू यापैकी काहीही वाहू नये. रोज सकाळी शुचिर्भूत होऊन रूद्राक्ष उजव्या हाताच्या मुठीत घ्यावा व वरील मंत्र ११ वेळा म्हणावा आणि साडेसातीची पीडा कमी करण्यासाठी शनि महाराजांची मनोमन प्रार्थना करावी.

उपाय ५ –
दर शनिवारी काळे तीळ, साखर व कणिक एकत्र करून मुंग्यांस खावयास द्यावे.

उपाय ६ –
साडेसातीच्या काळात वर्षातून एकदा शनिशिंगणापूरी जाऊन श्री शनि महाराजांचे शनिवारी दर्शन घ्यावे. यथाशक्ती पूजा व ब्राह्मणास दान द्यावे.

उपाय ७ –
साडेसातीच्या काळात बुधवारी व शनिवारी मांसाहार, मद्यपान वर्ज्य करावे. चित्त शांत ठेवावे. आचरण शुद्ध ठेवावे.

उपाय ८ –
फक्त साडेसातीतच नाही तर एरवी सुद्धा आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करावी. त्यांच्या औषध-पाण्याचा खर्च उचलावा. आई-वडील नसल्यास कोणत्याही गरीब वृद्ध व्यक्तीची सेवा करावी किंवा वृद्धाश्रमात देणगी द्यावी.

उपाय ९ –
साडेसातीच्या काळात काळे वस्त्र, काळा धागा अंगावर परिधान करू नये.

उपाय १० –
शनिदेवता आजन्म ब्रह्मचारी असल्यामुळे ते स्त्रियांना त्यांच्या साडेसातीत कधीही त्रास देत नाहीत. घरातील स्त्रियांच्या डोळ्यात कोणत्याही कारणाने अश्रू येता कामा नये याची घरातील पुरुषांनी काळजी घ्यावी. घरातील स्त्रीचा मान ठेवावा मग ती घरातील लहान मुलगी असली तरी सुद्धा. अन्यथा त्रास देणारी व्यक्ती शनि महाराजांच्या दंडास पात्र ठरते.

हे लक्षात ठेवावे….
जेवढी समस्या तीव्र तेवढा उपाय तीव्र म्हणूनच आपल्या समस्येची तीव्रता लक्षात घेउन व आपल्या वेळेच्या उपलब्धतेनुसार वरीलपैकी एक उपाय निवडावा व त्यात सातत्य ठेवावे, उपाय खंडीत करू नये.

महत्त्वाचे….
शनि महाराजांच्या साडेसात वर्षांपैकी कोणती वर्ष आपल्याला लाभकारक आहेत, कोणती वर्ष आपल्याला अपायकारक आहेत हे त्या विशिष्ट कुंडलीचा अभ्यास केल्यावरच अचूक सांगता येते.

धन्यवाद.
सौ. उज्ज्वला गुंजीकर
कार्याध्यक्षा
संपर्क – 9967015279

#साडेसाती #शनिउपाय #शनिमहाराज #साडेसातीचेउपाय #ज्योतिषशास्त्र #शनिदोष #कुंडली #ग्रहदोषनिवारण #शनीअमावस्या #हनुमानउपाय #वैदिकउपाय #रुद्राक्षउपाय #उज्ज्वलागुंजीकर #संकेतज्योतिषमंडळ